याचिका अथवा सो कॉल्ड माफीनाम्यांबाबत चर्चा करताना, तत्पूर्वी तेव्हाची परिस्थिती अथवा संक्षिप्त पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. विनायक दामोदर सावरकरांना १५ मार्च १९१० रोजी लंडन येथे अटक झाली. मार्सेलिस बंदरात पलायन करीत असताना सावरकरांना पकडण्यात आले तो दिवस होता ८ जुलै १९१०. तिथून मग पुढे सावरकरांना भारतात आणण्यात आले व काही काळ मुंबईतील भायखळा व नंतर ठाणे तुरुंगात ठेवण्यात आले.
नाशिकचे जिल्हाधिकारी आर्थर जॅक्सन यांच्या हत्येत विनायक दामोदर सावरकरांचा सहभाग होता असे मानले जाते. हे प्रकरण ‘नासिक कॉन्स्पिरसी केस’ म्हणून प्रसिद्ध आहे. नासिक कॉन्स्पिरसी केस हि २३ जानेवारी १९११ मध्ये सुरु झाली व यात उपलब्ध केलेले पुरावे, साक्ष व इतर सवाल जबाब यावरून असे सिद्ध झाले, की या खटल्यातील आरोपी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी वापरलेले पिस्तूल तसेच इतर विविध ठिकाणी इंग्रज अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ले व हत्या यांच्यात वापरण्यात आलेली हत्यारे ही सावरकरांनी इंग्लंडहून भारतात छुप्या मार्गाने पाठवलेली होती. जॅक्सनची हत्या केल्याची कबुली हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी दिली होती. याप्रकरणी घेतलेल्या गेलेल्या जबाबाचे दस्तऐवज पुढीलप्रमाणे आहेत.
["Home Department (Political A) Proceedings, March 1910, nos. 87-106”, pp. 4-5.]
या विशिष्ट गुन्ह्याप्रकरणी, तसेच ब्रिटिश शासनाविरुद्ध युद्ध पुकारल्याबद्दल दोषी मानून विनायक दामोदर सावरकर यांना २ जन्मठेप, म्हणजेच कालापानी ची शिक्षा सुनावली गेली. यातील पहिली शिक्षा ही जॅक्सनच्या हत्येप्रकरणी १५ मार्च १९१० रोजी सुनावली गेली तर राजद्रोहासाठी जन्मठेप ही ८ जुलै १९१० रोजी सुनावण्यात आली. याच वेळी सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांनाही जन्मठेप सुनावण्यात आली होती. तसेच, जॅक्सन खटल्यातील इतर सहआरोपी - वामनराव जोशी, शंकर रामचंद्र सोमण यांनाही जॅक्सन खटल्यात जन्मठेप सुनावली गेली. अंदमानास नेण्यापूर्वी सावरकरांनी एक याचिका ठाणे कारागृहातून सरकारला लिहिल्याचा उल्लेख सावरकरांनी स्वतः 'माझी जन्मठेप' या पुस्तकात केला आहे. ही याचिका दोन्ही जन्मठेपेच्या शिक्षा एकत्र भोगण्यासंदर्भात होती मात्र इंग्रज सरकारने त्यांची ही याचिका मान्य केली नाही. जरी ही याचिका अंदमानातून लिहिली गेलेली नसली तरी सावरकर व इंग्रज सत्ता यांच्यातील हा कारागृहात गेल्यानंतरचा पहिला संवाद मानता येईल. (या याचिकेचा पुरावा अथवा लिखित मजकूर उपलब्ध होऊ शकला नाही. जर कुणाकडे असेल तर जरूर पाठवावा; माहिती अद्ययावत केली जाईल.)
सावरकरांना यानंतर अंदमानच्या कारागृहात पाठवण्यात आले, ज्याला सेल्युलर जेल म्हणूनही ओळखले जाते, जेथे राजकीय कैद्यांना, विशेषत: हिंसक आणि/किंवा हिंसाचार आणि देशद्रोहात सहभागी असलेल्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले होते. सावरकरांना ४ जुलै १९११ रोजी अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे महाराजा नामक बोटीवरून आणण्यात आले. सेल्युलर जेलमध्ये ते कैदी क्रमांक ३२७७८ म्हणून दाखल झाले. सावरकरांना सुरवातीस प्रतिदिन एक पौंड काथ्या कुटण्याचे काम देण्यात आले होते, या काळात १५ जुलै १९११ पासून पुढील ६ महिने सावरकरांना इतर कैद्यांपासून वेगळे कोठडीत बंद केले गेले. तत्सम उल्लेख ब्रिटिश जेल प्रशासनाने नोंदवलेल्या सावरकरांच्या history ticket किंवा इतिहास दर्शिकेत मिळतो. यादरम्यान १ ऑगस्ट १९११ रोजी सावरकरांना दोरी काम दिल्याची नोंद आहे. दिनांक १४ ऑगस्ट १९११ रोजी बॅरिस्टरची पदवी काढून घेतल्याचे शिक्षण सचिवांचे पत्र सावरकरांना देण्यात आले.
याच काळात १९११ मध्ये दिल्ली दरबार भरला होता, हा एकमेव दरबार असा होता की जो तत्कालीन सार्वभौम राजा जॉर्ज पंचम यांच्या उपस्थितीत भरला गेला. यावेळेस सद्भावना म्हणून कैद्यांकडून दया याचिका मागवण्यात आल्या होत्या, जेणेकरून सरकार तर्फे त्यांवर विचार केला जाऊन दिल्ली दरबारच्या निमित्ताने कैद्यांना माफी दिली जाऊन सुटका होईल. याचा एक भाग म्हणून इतर कैद्यांप्रमाणे विनायक दामोदर सावरकरांनी दिनांक ३० ऑगस्ट १९११ रोजी कारागृह आयुक्तांकडे सूट देण्यासंदर्भात आवेदन सादर केले. प्रस्तुत याचिका दिनांक ३ सप्टेंबर १९११ नाकारण्यात आली. ही सावरकरांनी लिहिलेली दुसरी याचिका मानता येईल. या याचिकेचा प्रत्यक्ष मजकूर हा प्रसिद्ध अथवा उपलब्ध झालेला नाही.