रविवार, १७ जानेवारी, २०२१

ब्लॉग विषयी थोडेसे....

 ने मजसि ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...

महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येक मराठी भाषिकाने हे काव्य वाचले किंवा ऐकले असेलच. अर्थात त्यालाही अपवाद आहेतच. मात्र, सावरकर हे व्यक्तिमत्वच असे आहे की त्यांचे नाव ऐकताच, त्यांनी केलेल्या लिखाणाची व काव्यरचनेची जाण असणार्‍यांना त्यांनी केलेली काव्य रचना कशी असेल याचा आपल्याला अंदाज होऊन जातो. मग ती वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी लिहिलेली छत्रपती शिवरायांची आरती असो, सागरास ही आपल्या मायभूमीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या देशभक्त भूमिपुत्राची तळमळ विशद करणारी आर्त हाक असो, किंवा छत्रपतींचे वर्णन करणारे प्रभो शिवाजीराजा काव्य असो, जे ऐकताच प्रत्येक शिवभक्ताच्या डोळ्यात नकळतपणे अश्रु तरळून येतात. मराठी मुलूखाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण कवी, नास्तिकवादाचा, आज्ञेयवादाचा पुरस्कार करणारे तत्वज्ञ, जातीभेद नष्ट व्हावा यासाठी जीवाचे रान करणारे समाजसुधारक, ज्यांच्या लिखाणातून प्रत्यक्ष जीवंत प्रसंग डोळ्यासमोर उभे करून नकळत डोळ्यातून आसवे आणणारे थोर लेखक, हिंदुत्व संकल्पनेस शब्दरूप देणारे थोर विचारवंत, दोन जन्मठेपांची शिक्षा होणारे भारताच्या इतिहासातील एकमेव स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी अशी कितीतरी संबोधने लावता येतील असे महान व्यक्तिमत्व या मराठी मुलूखास लाभले हे या मुलूखाचे भाग्य म्हटले तरी त्यात नवल नाही. एवढे महान व्यक्तिमत्व असूनही माफीवीर, इंग्रजांचा गुलाम, धर्मांध, अशा विविध नावाने, तेही स्वतःला स्वातंत्र्ययुद्धाचे ठेकेदार म्हणवणार्‍या कोंग्रेस पक्षश्रेष्ठी व कार्यकर्त्यांकडून हिणवले जाणारे सावरकर हे कदाचित एकमेव स्वातंत्र्यसेनानी ठरतात. अर्थात, काँग्रेसच्या बाबतीत You can love him, hate him but you can’t ignore him’ या नियमाने सावरकरांचा वारंवार होणारा उल्लेख काही अंशी फायद्याचाच आहे असे माझे वैयक्तिक मत झालेले आहे. भाजप हिंदुत्ववादी, त्याउपर सत्तेत, आता या सर्व परिस्थितीत सॉफ्ट टार्गेट कोण, तर सावरकर! ते काही टीकेची उत्तरे देण्यास हयात नाहीत, त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या  नेते व कार्यकर्त्यांचे फावते. अर्थात त्यांनी वारंवार केलेल्या टीकेमुळे सत्याचा शोध घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, हे एकप्रकारे फायद्याचेच म्हणायचे. त्या निमित्ताने का होईना सावरकरांना पूज्य मानणारे असो वा सावरकरांचे वैचारिक विरोधक असो, दोघांचेही सावरकरांच्या वाङ्ग्मयाचे वाचन वाढले आहे हे मात्र खरे. अर्थात, दोघेही स्वतःच्या सोयीचे तेवढेच वाचतात हेही तितकेच खरे. उदाहरण द्यायचे झाल्यास भाजप समर्थक सावरकरांचे मुस्लिम धर्मीय, अथवा इस्लाम संबंधीचे लिखाण अतिशय प्रेमाने पूजतात मात्र सावरकरांना अभिप्रेत हिंदुराष्ट्र संकल्पना, धर्मनिरपेक्षता, इतकेच काय, अगदी गोहत्या वा गायीप्रती हिंदूंना असलेले प्रेम याबाबतच्या सावरकरांच्या विचारांकडे कानाडोळा करतात.

याच पद्धतीने काँग्रेस समर्थकदेखील सोयीच्या गोष्टी वाचतात, त्याच्या नोंदी करून ठेवतात व वेळ आली की विशिष्ट वाक्य, शब्द त्याच्या मागच्या पुढच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सरळ चुकीच्या संदर्भात सादर करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. याची ठळक उदाहरणे द्यायची झाल्यास एक म्हणजे सावरकर ‘sorry’ म्हणाले. हा कीव यावी इतका हास्यास्पद आरोप जेव्हा स्वतःचे आडनाव गांधी (नेहरू यांचे वंशज) लावणार्‍याने सावरकरांचा उल्लेख करताना भाजपवर टीका करताना केला, तेव्हा त्या आरोपला पाठबळ देताना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या किती नाकी नऊ आले असावे याचा विचार न केलेलाच बरा. अर्थात, याचा संदर्भ देताना सर्व नेते कार्यकर्ते यांच्याकडून एकच हवाला दिला जातो म्हणजे मुजुमदारांच्या प्रकाशनात सामायिक करण्यात आलेली अनेकांपैकी एक सावरकररचित याचिका उर्फ माफीनामा’! त्या उल्लेखातील  माफी या शब्दाचा अर्थ काढला जातो Sorry’! अर्थात, त्या संपूर्ण लिखाणात सावरकरांनी Sorry’ कुठे म्हटले आहे हे मात्र कोणीच सांगत नाही. प्रस्तुत याचिकेचा संदर्भ देणार्‍यांनी याचिका वाचलेली नसते ते वेगळे सांगायला नको! मग ब्रिटीशांचे गुलाम वगैरे म्हणून वेळ मारून नेली जाते. आता या नवीन आरोपचा संदर्भ विचारला, तर त्याला पुरावा म्हणून, पत्राच्या अथवा याचिकेच्या शेवटी लिहिलेले I beg to remain your obedient servant’ या वाक्याचा हवाला देण्यात येतो.

प्रस्तुत गांधी नामक व्यक्तीने वा त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्तीच्या पणजोबांनी, इतकेच काय, काँग्रेसचे तत्कालीन नेते मोहनदास गांधी, सुभाषबाबू यांनी वेळोवेळी इंग्रजांना लिहिलेली पत्रे वाचली आहेत का किंवा स्वतःहून कधी पत्रे लिहिली आहेत का हा एक संशोधानाचा विषय. जर लिहिले असते तर पत्राच्या शेवटी कधीकाळी आपला कृपाभिलाषी किंवा आपला आज्ञाधारक असे लिहिले जात असे याचा गंध नसावा. आता एखाद्याच्या शब्दकोशात पत्राच्या शेवटी उल्लेखलेले  आज्ञाधारक हे गुलामी ठरत असेल तर त्यास कोणीच काही करू शकत नाही.  

या सर्वच आरोपांचे बहुतांशी संदर्भ जातात आरोप करणार्‍याने कधीही न वाचलेल्या याचिकांकडे. काहींसाठी तर सावरकरांनी माफीनामे(याचिका) लिहिले हीच टीका ठरते. आता अमेन्स्टि पीटीशन चा अर्थ माफीनामा आहे की गुन्हा सिद्ध झालेल्या कैद्याने आपले म्हणणे अथवा विनंती प्रशासनाकडे सादर करण्याची याचिका हे ये यांना कोण सांगणार. अंदमानात शिक्षा भोगत असणार्‍या कुठल्याही कैद्यास आपले म्हणणे, विनंती जेल प्रशासनापर्यंत किंवा सरकारपर्यंत  पोहोचवायची असेल तर त्यासाठी पिटिशन किंवा याचिका हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे जर कुठल्या कैद्याने पिटिशन अथवा याचिका लिहिली असेल, तर अशी याचिका लिहिणे चूक आहे हा तर्कच चुकीचा आहे . त्यामुळे, सावरकरांनी माफीनामे लिहिले किंवा याचिका लिहिल्या ही टीका कशी ठरू शकते हे समजण्याच्या पलीकडचे आहे. यातून काँग्रेस नेत्यांच्या मतासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात, जसे की,
राजकीय कैद्यांना परकीय इंग्रजांनी दिलेली शिक्षा सर्व भारतीय राजकीय कैद्यांनी विशेषतः सावरकरांनी निमूटपणे भोगायला हवी होती असे राहुल गांधी वा एकूणच काँग्रेस पक्षाचे अधिकृत मत आहे का?

जर असे असेल तर वेळोवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी ब्रिटिश प्रशासनास पाठविलेल्या याचिका चुकीच्या आहेत असे काँग्रेसचे अधिकृत मत आहे का?

सावरकरांनी केलेल्या बहुतांशी मागण्या या अंदमानात खितपत असलेल्या राजकीय कैद्यांना सवलती मिळाव्या यासाठी होत्या. अशा कुठल्याही सवलती मिळण्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे होते असे काँग्रेस पक्षाचे मत आहे का? आणि हे जर असेल तर ब्रिटीशांचे वैचारिक गुलाम सावरकर ठरतात की आजची काँग्रेस?

अर्थात, अशा प्रश्नांची काँग्रेस पक्षाकडून उत्तरे मिळवीत अशी माला अपेक्षा नाही. ब्लॉगचा श्रीगणेशा करण्यामागे माझा तो उद्देश नाही. हे जे काही माफीनामा-माफीनामा करून केविलवाणी टीका टिपण्णी केली जाते, त्याबाबत टीकाकारांना तसेच सत्याचा शोध घेऊ पाहणार्‍या शोधवीरांना सावरकरांनी लिहीलेल्या याचिकांशी मराठीत खर्‍या अर्थाने ओळख करून द्यावी इतकाच प्रामाणिक उद्देश या ब्लॉगचा आहे. अपेक्षा करूया याने लोकांचे डोळे उघडतील व अधिकाधिक लोक डोळसपणे खरे काय, खोटे काय हे स्वतःच्या मतीचा वापर करून ठरवतील व कुणाच्या ऐकीव कथांना वा व्हॉट्सएपवरील अर्धवट महितीस बळी पडणार नाहीत!

जय हिंद,
जय महाराष्ट्र


पार्श्वभूमी आणि याचिका क्रमांक एक व दोन

याचिका अथवा सो कॉल्ड माफीनाम्यांबाबत चर्चा करताना, तत्पूर्वी तेव्हाची परिस्थिती अथवा संक्षिप्त पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. विनायक दाम...